आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या फिफा वर्ल्डकपचा अर्ध टप्पा पूर्ण झाला आहे. अंतिम १६ संघांची निवड झाली आहे. १८ डिसेंबरच्या अंतिम सामन्यापर्यंत १५ लाख विदेशी पर्यटक येतील अशी कतारला अपेक्षा होती. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने कतारसह आसपासचे आखाती देशही पर्यटकांनी फुलले आहेत. पहिल्या फेरीच्या सामन्यांपर्यंतच ८ लाखांहून अधिक पर्यटक कतारला आले आहेत. २८.९ लाख तिकिटांची विक्री झाली आहे. अशा वेळी विक्रमी संख्येने चाहते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वर्ल्डकपच्या शर्यतीतून कतार बाहेर झाला असला तरी त्याने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. वस्तुत: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्याही देशाने घेतला नव्हता असा पुढाकार कतारने घेतला आहे. कतारने िवदेशी पर्यटकांसाठी व्हिसाची गरजच संपुष्टात आणली. वर्ल्डकपच्या आधी कतारच्या मद्य धोरणावर आणि समलैंगिक अधिकारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, इच्छाशक्ती असेल तर सर्वकाही शक्य आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. ४८ सामने झाल्यानंतरही ना कोणता गोंधळ उडाला ना कुठे मारहाण झाली. फिफाने सदस्य महासंघांना सांगितले, आम्हाला कतारमधून चार वर्षांच्या करारात ६०,७५० कोटी रुपये इतका विक्रमी महसूल मिळाला. तो रशियातील २०१८ मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या खर्चापेक्षा ८,१०० कोटी अधिक आहे. पर्यटकांचा पूर पाहता २०३० पर्यंत दरवर्षी इथे ६० लाख पर्यटक येण्याची कतारला अपेक्षा आहे. कतारच्या हॉटेल्समध्ये ४५ हजार खोल्या आहेत. तिथे ५ लाख लोकच थांबू शकतात. त्यामुळे अनेक पर्यटक जवळचे देश दुबई, रियाध, ओमान, मस्कतमध्ये थांबले आहेत. येथून चाहते ६० ते ९० मिनिटांच्या शटल फ्लाइटद्वारे कतारला पोहोचतात व सामना पाहून २४ तासांत परततात.
अल हिंद ट्रॅव्हल मॅनेजर सलमान अहमद सांगतात, ‘आम्ही कतारमध्ये कधीच इतके विदेशी एकावेळी येताना पाहिले नाही.’ दोहामध्ये राहणारे अभियंते उन्नीकृष्णनन म्हणतात, ‘मी इथे १० वर्षांपासून नोकरी करत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आम्ही गर्दीबाबत थोडे चिंतित होतो, पण इथली व्यवस्था इतकी चांगली आहे की, इथे १० लाख फुटबॉल चाहते फिरत आहेत, याचे आम्हाला आश्चर्य वाटते.’
मेसी-एमबापे हे फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक ९ गोल करणारे सक्रिय फुटबॉलपटू (सक्रिय म्हणजे जो खेळाडू निवृत्त होत नाही व त्यांचे संघ या वर्ल्डकपमधून बाहेर झाले नाही) सुपर-१६ मध्ये अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाला २-१ ने हरवले. मेसीने १ गोल केला. फ्रान्सने पोलंडला ३-१ ने हरवले. २ गोल एमबापेने केले. यासह मेसी व एमबापेचे वर्ल्डकप इतिहासात ९-९ गोल झाले आहेत. दोघांकडे पेले (१२ गोल) यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
गोल्डन बूटच्या शर्यतीत एमबापे पुढे : २३ वर्षीय एमबापेचे यंदा सर्वाधिक ५ गोल आहेत. मेसी, मोराटा, रॅशफोर्ड आणि जिरॉर्ड यांचे आतापर्यंत ३-३ गोल आहेत. रोनाल्डो अद्याप एकच गोल करू शकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.