आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दर्जेदार कामगिरी:बाेनस खेळीने अभ्यासाची साधना सिद्धीस, सुवर्ण हॅट्ट्रिकने गाजवला आखाडा; दहावीच्या परीक्षेत नॅशनल खेळाडूंची दर्जेदार कामगिरी

एकनाथ पाठक । औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धी शर्मा - भाग्यश्री फड - जान्हवी पेठ
  • दहावीच्या परीक्षेत नॅशनल खेळाडूंची दर्जेदार कामगिरी
  • मैदानावरील अव्वल खेळीसह शिक्षणातही मिळवले सर्वाेत्तम यश;
  • औरंगाबादच्या इंटरनॅशनल जिम्नॅस्ट सिद्धी व रिद्धीचेही लक्षवेधी यश

महाराष्ट्राच्या मराठमाेळ्या युवा महिला खेळाडूंनी जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर राष्ट्रीय मैदान गाजवत दहावीच्या परीक्षेतही यशस्वी कामगिरीने कर्तृत्वाचा झेंडा फडकवला. यात परभणीच्या नॅशनल कबड्डीपटू सिद्धी शर्माचे यश लक्षवेधी ठरले. यूथ नॅशनल कबड्डी स्पर्धा गाजवणाऱ्या या युवा खेळाडूने पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची बाेनस कामगिरी केली. तसेच, खेलाे इंडियातील चॅम्पियन कुस्तीपटू भाग्यश्री फडनेही माध्यमिक शालांत परीक्षेत माेठे यश संपादन केले.

त्यापाठाेपाठ जानकी पुरस्कार विजेत्या गुणवंत खाे-खाेपटू जानव्ही पेठेनेही या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरीचा पल्ला गाठला. खेलाे इंडियामध्ये पदकांची हॅट््ट्रिक गाजवणाऱ्या सिद्धी हत्तेकरनेही माेठे यश िमळवले.

सिद्धी शर्मा (100%) : मेहनतीला मिळाली यशाची साक्ष

मैदानावरील अव्वल कामगिरीतून अभ्यासातील साधनाही सिद्धी शर्माने कायम ठेवली. त्यामुळे तिला दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवता आले. पाथरीच्या देवनांद्रा माध्यमिक हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या या खेळाडूने ४८६+१४ असे १०० टक्के गुण संपादन केले. तिने गतवर्षी झालेल्या यूथ गेम्स नॅशनल कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ कांस्य पदकाचा मानकरी ठरला हाेता. याशिवाय तिची राज्य आणि फेडरेशनच्या स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे. त्यापाठाेपाठ नॅशनल कबड्डीपटू साक्षी चव्हाणने मेहनतीतून ९६.६ टक्के गुण मिळवले आहेत. तिने गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

भाग्यश्री फड (91.40%) : सत्रामध्ये गाेल्डन हॅट्ट्रिक साजरी

श्रीगाेंदा येथील आंतरराष्ट्रीय मल्ल भाग्यश्री फडनेही कुस्तीच्या आखाड्यापाठाेपाठ दहावीच्या परीक्षेतही बाजी मारली. यंदाच्या सत्रात सुवर्णपदकांची हॅट््ट्रिक साधत तिने दहावी परीक्षेत ९१ टक्के गुण संपादन करण्याचा पराक्रम गाजवला. तिने यंदा खेलाे इंडिया, यूथ कॅडेट आणि नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले. तिची या तिन्ही स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली. हिच साेनेरी कामगिरी कायम ठेवत तिने अभ्यासातही बाजी मारली. यातून तिला सातत्यपूर्ण सरावासह परीक्षेत माेठे यश संपादन करता आले.

जान्हवी पेठे (८९%) : अडचणींना खाे देत प्रगती

नॅशनल खाे-खाेपटू आणि सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा जानकी पुरस्कार विजेत्या जान्हवी पेठेनेही माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. अनेक आव्हानांना परतावून लावत तिने ८९ टक्के गुण संपादन केले. तिला गत वर्षीच्या नॅशनल खाे-खाे स्पर्धेत जानकी पुरस्काराने गाैरवण्यात आले. याशिवाय आैरंगाबादच्या राष्ट्रीय खाे-खाेपटू मयूरी पवारनेही ८६ टक्के गुण मिळवले.

0