आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादच्या जिम्नॅस्ट सिद्धी हत्तेकरने सोमवारी चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये राैप्यपदक पटकावले. यासह तिने आपल्या नावे खेलो इंडियातील ओव्हरऑल विक्रमी सहाव्या पदकाची नोंद केली. गत चॅम्पियन महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व अबाधित राखताना चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सोमवारी १३ पदकांची कमाई केली. यामध्ये दाेन सुवर्णांसह सहा राैप्य आणि पाच कांस्यपदकाचा समावेश आहे. यासह महाराष्ट्र संघ पदकतालिकेतील दुसऱ्या स्थानी आहे. पूजा दानाेळेने सायकलिंगमध्ये आणि रूपेश संगेने योगामध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. महाराष्ट्राने चौथ्या दिवशीही सायकलिंग आणि योगासनात सुवर्णपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक मिळाले. कबड्डीतही मुलांच्या संघात तिसरे स्थान मिळाले आहे. महिला संघाने कबड्डीत फायनल गाठली आहे. बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीने अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्राने २ सुवर्ण, ६ रौप्य व ५ कांस्य अशी पदके पटकावली. सायकलिंगमध्ये १ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्यपदक मिळाले. जिम्नॅस्टिकमध्ये १ रौप्य, १ कांस्य, तर वेटलिफ्टिंगमध्ये १ कांस्य, योगामध्ये १ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य पदक मिळाले.
जुळ्या बहिणींची पदकांची लक्षवेधी कामगिरी
रिद्धी आणि सिद्धी या जुळ्या बहिणींनी स्पर्धेत पदक जिंकण्याची लक्षवेधी कामगिरी साधली. रिद्धीने रविवारी कांस्यपदकाने महाराष्ट्राला जिम्नॅस्टिकमध्ये खाते उघडून दिले. त्यापाठाेपाठ सिद्धीने सोमवारी जिम्नॅस्टिकमध्ये राैप्यपदक जिंकले. हे तिचे खेलो इंडियातील सहावे पदक ठरले. यात चार राैप्यसह प्रत्येकी एका सुवर्ण आणि कांस्यपदकाचा समावेश आहे. सिद्धी आणि रिद्धी या हत्तेकर बहिणींनी पहिल्या सत्रापासून जिम्नॅस्टिक खेळ प्रकारातील आपले वर्चस्व अबाधित ठेवत चौथ्या सत्रातही पदकाची कमाई केली.
कबड्डी : महाराष्ट्र महिला संघाला किताबाची संधी
हरजितकाैरच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने आपली विजयी मोहीम कायम ठेवताना स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. यासह महाराष्ट्र संघाने किताबाचा आपला दावा मजबूत केला. महाराष्ट्र महिला संघाने सोमवारी उपांत्य सामन्यात तामिळनाडूचा २३ गुणांनी पराभव केला. संघाच्या विजयात कर्णधार हरजितसिंग संधू, यशिका पुजारी, मनीषा राठोड आणि अनुजा शिंदे यांचे मोलाचे योगदान राहिले.
बॅडमिंटन : दर्शन फायनलमध्ये; आज सुवर्णसंधी
महाराष्ट्राच्या सुपरस्टार बॅडमिंटनपटू दर्शन पुजारीने आपली विजयी मोहीम कायम ठेवताना पदकाचा पल्ला गाठला. त्याने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने एकेरीच्या उपांत्य सामन्यात हरियाणाच्या एम.चौधरीचा पराभव केला. त्याने २१-१७, २३-२१ ने सामना जिंकला. आता त्याला मंगळवारी सुवर्णपदकाची संधी आहे. त्याची फायनल आज तामिळनाडूच्या ऋत्विक संजीवसोबत हाेणार आहे.
वडिलांच्या मेहनतीला सोनेरी यशाचा मुलामा
सांगली शहरात चहाची टपरी लावत येणाऱ्या पैशातून मुलीच्या डायटवर खर्च करणाऱ्या वडिलांच्या मेहनतीला सोनेरी यशाचा मुलामा देण्याचे लक्षवेधी काम वेटलिफ्टर काजल सरगरने केले. सांगलीच्या या युवा वेटलिफ्टरने पंचकूला येथे आयोजित चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत रविवारी चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. काजलने ४० किलो वजनगटात हे नैपुण्य दाखवले. या गटात तिने ११३ किलो वजन उचलले. स्नॅच या प्रकारात ५० आणि क्लिन अँड जर्क प्रकारात ६३ किलो वजन उचलले. काजलचा भाऊ संकेत सरगर हाही खेळाडू आहे. तो सध्या इंडिया कॅम्पमध्ये आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.