आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाॅर्मात असलेला युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (५७) आणि सामनावीर माेईन अलीने (४/२६) साेमवारी यजमान चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा यंदाच्या आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर दणदणीत विजय साजरा केला. यजमान चेन्नई संघाने लीगमधील आपल्या दुसऱ्या सामन्यामध्ये लाेकेश राहुलच्या लखनऊ सुपरजायंट्स संघाचा पराभव केला. चेन्नई संघाने १२ धावांनी सामना जिंकला. यासह सलामीच्या पराभवातून सावरलेल्या चेन्नई संघाला यंदा लीगमध्ये आपला पहिला विजय साजरा करता आला.
ऋतुराजच्या अर्धशतकाच्या बळावर चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरामध्ये लखनऊ संघाला निर्धारित २० षटकांमध्ये ७ गड्यांच्या माेबदल्यामध्ये २०५ धावांपर्यंत मजल मारता आली. संघाचा सलामीवीर कायले मेयर्सची (५३) एकाकी अर्धशतकी खेळीची झुंज व्यर्थ ठरली.
ऋतुराजचे यंदा लीगमध्ये सलग दुसरे अर्धशतक
पुण्याच्या युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (५७) आपली तुफानी खेळीची लय कायम ठेवताना यंदाच्या १६ व्या सत्रातील लीगमध्ये सलग दुसरे अर्धशतक साजरे केले. त्याने गत शुक्रवारी गतचॅम्पियन गुजरात संघाविरुद्ध झंझावाती ९२ धावांची खेळी केली हाेती. त्याने आता दुसरे अर्धशतक झळकावले.
धाेनी पाचहजारी; चेन्नईचा २४ व्यांदा सर्वाेच्च स्काेअर
चार वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाने साेमवारी घरच्या मैदानावर ७ बाद २१७ धावा काढल्या. यासह चेन्नईच्या नावे सर्वाधिक २४ वेळा आयपीएलमध्ये सर्वाेच्च धावसंख्या रचण्याच्या विक्रमाची नाेंद झाली. या सर्वाधिक २००+ धावसंख्येच्या यादीत बंगळुरू संघ (२२) दुसऱ्या व पंजाब किंग्ज (१७) तिसऱ्या स्थानी आहे. तसेच धाेनीने ३ चेंडूंत १२ धावा काढल्या. यासह त्याच्या आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण झाल्या. हा पल्ला गाठणारा धाेनी पाचवा फलंदाज ठरला.
९ डावांत काॅन्वेसाेबत तिसरी शतकी भागीदारी
ऋतुराजने सहकारी डेवाेन काॅन्वेसाेबत (४७) चेन्नई संघाला शतकी भागीदारीची सलामी दिली. या दाेघांनी ११० धावांची भागीदारी रचली. ऋतुराजने चेन्नईकडून सहकारी काॅन्वेसाेबत ९ डावांत तिसरी शतकी भागीदारी केली. ऋतुराजने ३१ चेंडूंमध्ये ५७ धावांची खेळी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.