आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • The Arena Of Maharashtra Kesari Competition Will Be Played Without Wrestling Spectators

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र केसरी:कुस्तीप्रेमी प्रेक्षकांशिवाय रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आखाडा

पुणे2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • स्पर्धा आयाेजनाला अद्यापही राज्य सरकारची नाही परवानगी

काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन अद्याप भारतासह महाराष्ट्रातही क्रीडा स्पर्धांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अनेक राष्ट्रीय स्पर्धांपाठाेपाठ महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचेही आयाेजन अडचणीत सापडले आहे. मात्र, आयपीएलच्या धर्तीवरच आता प्रेक्षकाविना ही प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा आयाेजित करण्याची तयारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत दाखवली आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच्या सुरुवातीपर्यंत या स्पर्धेचे आयाेजन केले जाण्याची शक्यता आहे. यासाठी परिषदेच्या हालचाली सुरू आहेत. कारण, १५ फेब्रुवारीपूर्वीच ही स्पर्धा आयाेजित करणे गरजेचे आहे.

त्यामुळेच काेराेनाच्या पार्श्वभूमीवर कुस्तीप्रेमी प्रेक्षकांशिवाय ठरावीक लाेकांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पाडण्याची तयारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेने दर्शवलेली आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप स्पर्धा आयाेजनास केंद्र अथवा राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. काेराेनाच्या काळात लाॅकडाऊनमुळे सर्वच खेळांवर बंदी आली आणि कुस्तीचे आखाडे आेस पडून विविध स्पर्धांची तयारी करणाऱ्या पैलवानांवर मागील आठ महिन्यांपासून संकटाचे ढग दाटून आले आहेत. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा जानेवारी, फेब्रुवारीत घेण्याची तयारी दाखवण्यात आली असली तरी अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही.

आॅनलाइन प्रवेशिकांची संधी : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची वेबसाइट कार्यान्वित करण्यात आली. शहर व जिल्ह्याच्या कुस्तीगीर संघटनांमार्फत हाेणाऱ्या सर्व स्पर्धांना प्रवेशिका वेबसाइटच्या माध्यमातून आॅनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जाणार आहेत. प्रत्येक खेळाडूची जन्मतारीख, वय, नाव, जिल्हा आदी माहितीची अगाेरदच तपासणी होईल व खेळाडूंना अडचण येणार नाही. प्रक्षेपण फेसबुक व यूट्यूबद्वारे लाइव्ह करण्याकरिता साेशल मीडिया टीमचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.

१५ फेब्रुवारीपूर्वी या स्पर्धा घेणे गरजेचे असल्याने महासंघाचा शासनाकडे पाठपुरावा
काेराेनामुळे बंद असलेल्या सर्व राज्य कुस्ती स्पर्धा सुरू व्हाव्यात याकरिता भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे अधीन राहून स्पर्धा आयाेजित करू; परंतु स्पर्धेकरिता लवकर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सर्व माेठ्या कुस्ती मैदानांची आयाेजकांकडून परवानगी मागितल्यावर आयाेजकांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून परवानगी देण्यात येईल व मैदानासाठी परिषदेचे अधिकृत पंच माेफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुस्तीप्रेमी लुटणार आॅनलाइन आनंद
काेराेनाचे रुग्ण कमी हाेणे व प्रतिबंधात्मक लस निर्मिती या दाेन कारणांमुळे अद्याप कुस्ती स्पर्धांकरिता परवानगी मिळालेली नाही. युराेपात काेराेनाची दुसरी लाट आल्याने सर्व जागतिक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. आॅलिम्पिकशी संलग्न राहत काेराेनाच्या पार्श्वभूमीवर याेग्य खबरदारी घेऊन कुस्ती स्पर्धा सुरू करण्याकरिता भारतीय कुस्तीगीर संघटना प्रयत्नशील आहे. स्पर्धा दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडते. १५ फेब्रुवारीपूर्वी स्पर्धा घेणे गरजेचे असल्याने यंदा ठरावीक लाेकांच्या उपस्थितीत प्रेक्षकांविना स्पर्धा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली. गत वेळी आॅनलाइन पद्धतीने आठ ते दहा लाख लाेकांनी कुस्तीचा आनंद घेतलेला हाेता. सध्या काळात खेळ टिकवणे महत्त्वाचे असून यूट्यूब, फेसबुक, टीव्ही चॅनल याद्वारे आॅनलाइन प्रेक्षक मिळू शकतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser