आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशिया खंडातील पहिला स्टेनलेस जलतरण तलाव आैरंगाबादेत तयार करण्यात आला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातील सेंटर ऑफ एक्सलन्समधील १६ काेटी खर्चून तयार झालेल्या या पुलाचे उद्घाटन उद्या गुरुवारी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हाेणार आहे. तसेच हाॅकीच्या अॅस्ट्राे टर्फ मैदानाचेही उद्घाटन हाेईल. क्रीडामंत्री अत्याधुनिक स्वरूपातील तलवारबाजीच्या हाॅलचे भृमिपूजन करणार आहेत. औरंगाबादच्या इतिहासात देशाचे क्रीडा मंत्री प्रथम शहरात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संचालक वीरेंद्र भांडरकर, पंकज भारसाखळे, डॉ. उदय डोंगरे, गोविंद शर्मा उपस्थित होते.
२० बाय ५० मीटरचा साडेदहा काेटींचा स्विमिंग पूल
औरंगाबाद साई केंद्रात भारतातील व आशिया खंडातील पहिला स्टेनलेस स्टीलचा जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी जवळपास १०.३६ कोटी रुपयांचा आतापर्यंत खर्च आला. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा २० बाय ५० मीटरचा तलाव आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या कंपनीने तलाव तयार केला होता, त्याच विदेशी कंपनीने हा तलाव बनवला. याशिवाय या ठिकाणी दिव्यांगासाठी रॅम्प, मनपा-बोअर-विहिरीचे पाणी, बाथरूम, शॉवर, चेजिंग रूम, अत्याधुनिक फिल्टरची सुविधा बनवण्यात आली आहे. या सर्व सुविधांमुळे हा पुल अधिक चर्चेत आहे.
हॉकी टर्फसाठी ५.३० कोटी; सराब शिबिरांसाठी महत्त्वाचा
साईत मराठवाड्यातील पहिले अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानात तयार करण्यात आले. हे टर्फ बनवण्यासाठी जवळपास ५.३० कोटी रुपये खर्च आला. विशेष म्हणजे येथील ब्लू टर्फ आहे. देशात केवळ चार ठिकाणी अशाप्रकारे टर्फ आहेत. एनपीसीसी कंपनीने त्याचे काम केले. दीड वर्षापूर्वी तयार झालेल्या टर्फवर भारतीय कनिष्ठ संघाचे शिबिर व एक राज्य स्पर्धा पार पडली आहे.
तलवारबाजीचा देशातील पहिला अत्याधुनिक हॉल
तलवारबाजी खेळाला चालना देण्यासाठी आता आैरंगाबादच्या साईमध्ये अत्याधुनिक स्वरूपातील हाॅल तयार करण्यात येणार आहे. हा देशातील पहिला हॉल असेल. त्यासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याबरोबर साहित्यसाठी ३.९० कोटी रुपये मिळतील. येथे वातानुकूलित सुसज्ज हॉल, चेजिंग रूम, सीटिंग गॅलरी, बाथरूम सुविधा येथे उपलब्ध असणार आहेत.
आैरंगाबादच्या क्रीडा विश्वाला मिळेल चालना
अत्याधुनिक प्रकारच्या जलतरण तलाव आणि हाॅकीच्या अॅस्ट्राे टर्फसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने आता आैरंगाबादच्या क्रीडा विश्वाला चालना देणारी ठरणार आहे,असे संचालक वीरेंद्र भांडारकर म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.