आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Headache Of Night Matches, The Issue Of Gender Discrimination On The Air

फ्रेंच ओपन:रात्रीच्या सामन्यांची डोकेदुखी, स्त्री-पुरुष भेदभाव मुद्दा ऐरणीवर

पॅरिसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयोजकांना फटका; कमाईत घसरण खेळाडू, चाहत्यांसमोर अडचणी

यंदाच्या सत्रातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील रात्रीचे सामने आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यामुळे खेळाडूंसह चाहत्यांनीही प्रचंड नाराजी व्यक्त केली. याशिवाय याचा सर्वात मोठा फटका आयोजकांना बसत आहे. रात्रीच्या सामन्यांचा विपरीत परिणाम हा थेट आयोजकांच्या कमाईवर पडत आहे. यामुळे महसुलामध्ये प्रचंड घसरण झाल्याची भीतीही आयोजकांनी व्यक्त केली.

दहा वर्षांपूर्वी रोलां गॅरोमध्ये स्पर्धेच्या वार्तांकनादरम्यान प्रसिद्ध फ्रेंच टेनिस लेखक फिलिप बाेईन यांनी रात्रीच्या सामने आयोजनाला पहिली पसंती दर्शवली. त्यांच्या याच मागणीवर मोठा विचार करण्यात आला. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी म्हणजेच २०२१ मध्ये या सामन्यांच्या रात्री आयोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, यादरम्यान लेखक बाेईन हे निवृत्त झाले होते. आता हाच रात्रीच्या सामन्यांचा निर्णय चाहत्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. जगातील नंबर वन नाेवाक योकोविक आणि राफेल नदाल यांच्यातील उपांत्यपूर्व सामना रात्री रंगला. भारतीय वेळेनुसार हा सामना पहाटे ४.४५ वाजता संपला. स्टेडियममध्ये मोठ्या संख्येत चाहत्यांची गर्दी होती. मात्र, सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर पडलेल्या चाहत्यांना अडचणींचा सामना करावा लागला. रात्री १.२० वाजेनंतर प्रवासासाठी कोणत्याही प्रकारची वाहन व्यवस्था नव्हती. हीच गैरसाेय लक्षात घेऊन अनेक चाहत्यांनी आपल्या घरीच टीव्हीवर हा सामना पाहण्याला पहिली पसंती दर्शवली.

आतापर्यंत १० सामने रात्री; फक्त एक महिलांची लढत
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दरम्यान आयोजकांकडून स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जात असल्याचा आरोपही चाहत्यांनी केला. आयोजकांनी यंदा आतापर्यंत रात्री उशिरा दहा सामने खेळवले. यामध्ये फक्त महिलांच्या एकाच लढतीचा समावेश होता. यावर महिला चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या संचालिका आणि माजी नंबर वन टेनिसपटू माॅरेस्मो यांनी महिलांच्या सामन्यांना दुय्यम असल्याचे म्हटले. याच प्रतिक्रियेवरून महिला चाहत्यांनी आपला रोष व्यक्त केला. या सर्वांनी आपले मत मांडले. ‘आम्हाला पुरुष गटातील सामने पाहण्यात कोणत्याही प्रकारचा रस नाही. आम्ही महिला एकेरी, दुहेरीचे सामने पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलाे. मात्र, आम्हाला आतापर्यंत फक्त एकच सामना पाहावयास मिळाला, अशी प्रतिक्रिया महिला चाहत्यांनी दिली.यादरम्यान त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

माॅरेस्मोवर स्वातेकची नाराजी : ‘संचालिका माॅरेस्मो यांची ही प्रतिक्रिया आम्हाला धक्का देणारी आहे. त्यामुळे अनेक महिला खेळाडूंमध्ये नाराजी आहे, अशी प्रतिक्रिया जगातील नंबर वन महिला टेनिसपटू इगा स्वातेकने स्पर्धेच्या संचालिका माॅरस्मो यांच्या वक्तव्यावर दिली.

सामन्यांकडे चाहत्यांची पाठ
फ्रेंच ओपन सामन्यांच्या रात्रीच्या आयोजनाला आता चाहत्यांनीच विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या सामन्यांच्या वेळी स्टेडियममध्ये फारशी गर्दी नसते. गैरसाेयी आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणींना लक्षात घेऊन चाहत्यांनीच या रात्रीच्या सामन्यांकडे पाठ फिरवली.

बातम्या आणखी आहेत...