आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tokyo Olympics: Mirabai Chanu Wins Silver, India's First Silver In 125 year Olympic History Of Weightlifting

टोकियो ऑलिम्पिक:मीराबाई चानूला रौप्यपदक, वेटलिफ्टिंगच्या 125 वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात भारताचे पहिले रौप्य

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठीसाठी कर्णम मल्लेश्वरी
हे ऑलिम्पिक पदक एका ॲथलिटच्या कमबॅकचे उत्कृष्ट उदाहरण, मीरासारखे कष्ट चानूने घेतले...

मणिपूरच्या एका दुर्गम गावात लाकडे गोळा करणारी मीरा आज भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील सर्वात उंच स्थानावर पोहोचली आहे. टोकियोत शनिवारी मीराबाई चानूने रौप्यपदक पटकावून स्वत:ला पुन्हा सिद्ध करणारे उत्कृष्ट उदाहरण दाखवून दिले. रिओ ऑलिम्पिकमध्ये चानूचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर तिच्या कारकीर्दीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रश्नांचे ओझे तिच्यासाठी वेटलिफ्टिंगपेक्षा कितीतरी अधिक असेल. या अपयशामुळे तिला मानसोपचारही घ्यावे लागले होते. मात्र, प्रत्येक वेळी दाट अंधारानंतर प्रकाश असतोच. तशीच चानूही उजळून निघाली. दीड वर्ष प्रशिक्षणापासून दूर राहूनही तिने या क्षेत्रात दमदार पुनरागमन केले. राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने सातत्याने आपली कामगिरी सुधारत नेली. येथवर पोहोचण्यासाठी चानूने अगदी मीराबाईसारखे कष्ट घेतले. याचाच परिणाम म्हणजे शनिवारी चानू अगदी शांत होती. तिचा संयम आणि आत्मविश्वास इतर खेळाडूंपेक्षा वेगळा होता. स्नॅच प्रकारात तिचा सकारात्मक पैलू अधिक स्पष्ट दिसला. यातच तिला नेहमी मागे राहावे लागत असे. तिने या प्रकारात ८७ किलो वजन उचलले. वास्तविक चानू इतर अॅथलिट‌्सची शक्ती जाणून असते. परंतु, विश्वास मात्र आपल्या सज्जतेवर असतो. म्हणून ती इतरांच्या स्पर्धेचा विचार करत नाही. म्हणूनच जेव्हा चिनी ॲथलिट होउ जीहुईने आघाडी घेतली तेव्हा चानूने जेवढे पेलेल तेवढेच ११७ किलो वजन उचलले. कारण, तिला रिओमधील ती चूक टाळायची होती. प्रशिक्षणादरम्यान चानू आपल्या बहिणीच्या लग्नालाही गेली नव्हती. तयारीबाबत ती किती गंभीर होती हे यातून स्पष्ट होते.

खरे तर व्हायचे होते तिरंदाज, व्हिडिओ पाहून वेटलिफ्टिंग करू लागली
१९९६ मध्ये इम्फाळपासून २० किमी दूर नोंगथोंग काकचिंग गावातील एका गरीब कुटुंबात मीराबाईचा जन्म झाला. ६ भावंडांत ती सर्वात लहान. १२ वर्षांची असतानाच ती भावापेक्षा अधिक वजनाची लाकडे उचलून घेत असे. ती म्हणते, माझे भाऊ-चुलत भाऊ फुटबॉल खेळत आणि धूळ-माती घेऊन घरी परतत. मला असा खेळ नको होता. स्वच्छ खेळ हवा म्हणून तिरंदाज व्हायचे होते. १३ वर्षांची असताना प्रशिक्षकाच्या शोधात ती इम्फाळमध्ये साई सेंटरवर आली. मात्र, प्रशिक्षक मिळाला नाही. याच काळात तिने कुंजाराणी देवीचा २००४ मधील वजन उचलतानाचा व्हिडिओ पाहिला आणि नशीब पालटले. काही दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर अनिता चानू यांची भेट झाली. सकाळी ६ वाजता प्रशिक्षण शिबिरात पोहोचण्यासाठी मीराला दोन वेळा बस बदलावी लागत होती.

‘डिड नॉट फिनिश’चा धक्का अन् पदकापर्यंतचा प्रवास
मीराने २०१६ मध्ये रिओपासून २१व्या वर्षी ऑलिम्पिक कारकीर्द सुरू केली. मात्र, पहिल्याच स्पर्धेत वजन उचलू शकली नाही म्हणून तिचा धीर सुटला. दुसरा-तिसरा प्रयत्नही अपयशी ठरला. तिच्या नावासमोर “डिड नॉट फिनिश’ असे लिहिले गेले. अश्रू घेऊन ती परतली. एक वर्षानंतर २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपद, नंतर २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिने आत्मविश्वास मिळवला. नंतर दुखापतीमुळे दीड वर्ष ती बाहेर होती. नंतर मात्र ती जोमाने परतली.

मी ५ वर्षांपासून हे स्वप्न पाहत होते. या क्षणासाठी माझे कुटुंबीय, विशेषत: आईने खूपच त्याग केला आहे. त्या सर्वांचे आभार.’ - पदक जिंकल्यानंतर

‘ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगला प्रारंभ होऊ शकत नाही. मीराबाई चानूची उत्कृष्ट कामगिरी. भारताला रौप्य मिळवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मीराबाई यांचे हे यश प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे.’- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

- चीनची जीहुईने २१० किग्रॅ वजन उचलून सुवर्ण पटकावले. - मीराबाई २०२ किग्रॅ वजन उचलून दुसऱ्या स्थानी. - इंडोनेशियाची ऐसाह विंडी केंतिका १९४ किग्रॅ उचलू शकली

बातम्या आणखी आहेत...