आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Vaibhav Purvala Gold Medal; Gadekar Was Able To Wrestle In The Arena Built By His Father After Selling The Land

खेलो इंडिया युवा स्पर्धा:वैभव-पूर्वाला सुवर्णपदक; वडिलांनी जमीन विकून बनवलेल्या आखाड्यात गादेकर शकली कुस्ती

पंचकुला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले. ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राने एका सुवर्णासह तीन पदके आपल्या खात्यात जमा केली. कोल्हापूरच्या वैभव पाटीलने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. वाशिमच्या कल्याणी गादेकरने रौप्य आणि पुण्याच्या पल्लवी पोटफोडे कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्राच्या नावे २६ सुवर्णांसह ७३ पदके झाली आहेत. संघ गुणतालिकेत सध्या हरियाणानंतर दुसऱ्या स्थानी आहे.

कुस्ती स्पर्धेत दोन मल्ल नाही, तर दोन राज्यांचा सामना पाहायला मिळाला. यात महाराष्ट्राने बलाढ्य हरियाणाला पराभूत करत आखाडा गाजवला. मुलांच्या फ्रीस्टाइल प्रकारात ५५ किलो वजन गटातील अंतिम लढतीत वैभव पाटीलने हरियाणाच्या सुरिंदरला एकतर्फी सामन्यात ८-० गुणांनी पराभूत केले. वैभवने अत्यंत चपळ व वेगवान खेळ करत अवघ्या ४० सेकंदांत सुरिंदरला चितपट केले. त्याने सुरिंदरला एकही डाव टाकण्याची संधी दिली नाही. वैभवने पहिल्या दस्ती ओढून २ गुण आपल्या खात्यात जमा केले. त्यानंतर भारंदाज डाव टाकला आणि पट काढत हरियाणाच्या मल्लाला चितपट करत सोनेरी यश मिळवले. मुलींच्या ६५ किलो वजन गटात पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पल्लवी पोटफोडेने कांस्यपदक आपल्या नावे केले. पदकाच्या लढतीत पल्लवीला राजस्थानच्या साक्षीने ३-१ गुणांनी पराभूत केले. पल्लवी गुणांसाठी सामन्यामध्ये संघर्ष करताना दिसली.

अॅथलेटिक्स : पूर्वा सावंतचीची सुवर्ण उडी, प्रांजलीने जिंकले कांस्य अॅथलेटिक्समध्येदेखील महाराष्ट्रासाठी बुधवारचा सोनेरी दिवस ठरला. राज्यातील युवा खेळाडू पूर्वा हितेश सावंतने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिने तिहेरी उडी प्रकारात १२.६९ मीटर उडी घेत ही पदकीय कामगिरी साधली. मुंबईची पूर्वा सध्या बंगळुरू साईमध्ये सराव करते. तिला प्रशिक्षक बॉबी जाॅर्ज यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर प्रांजली दिलीप पाटीलने १०० मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक पटकावले. तिने १४.३८ सेकंदांत हे पदक मिळवले. प्रांजलीदेखील मुंबईची असून ती जेएसडब्ल्यू टाऊनशिप विद्यानगर येथे सराव करते. तिला बाबा चैतन्य यांचे मार्गदर्शन लाभले. गुरुवारी महाराष्ट्राचे आणखी ५ खेळाडू पदकाच्या शर्यतीत आहेत, अशी माहिती प्रशिक्षक जयकुमार टेंबरे यांनी दिली.

कल्याणीने जिंकले रौप्यपदक मुलींच्या ५३ किलो वजन गटात कल्याणी गादेकरने रौप्यपदक पटकावले. तिचे खेलो इंडियातील तिसरे पदक ठरले. यापूर्वी पुण्यातील स्पर्धेत तिने रौप्य आणि आसामच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. १७ वर्षीय कल्याणी वाशिम जिल्ह्यातील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील खेळाडू आहे. तिला सरावासाठी गावात किंवा परिसरात कोणताही आखाडा नसल्याने तिच्या वडिलांनी आपल्या शेतातच मातीचा कुस्ती आखाडा तयार केला. कल्याणीला प्रथम घरीच कुस्तीचे प्राथमिक डावपेच शिकवले. मुलींनी कुस्तीत पुढे जावे यासाठी तिच्या वडिलांनी तिला हरियाणाला पुढील प्रशिक्षणासाठी पाठवले. तेथील खर्च व खुराकाचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने तिच्यासाठी २ एकर जमीनदेखील विकली. सध्या कल्याणी मुंबईतील कांदिवली साईमध्ये प्रशिक्षक अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तसेच तिला भारतीय संघाच्या प्रशिक्षिका शेख शबनम यांनीदेखील मार्गदर्शन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...