आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli Gautam Gambhir Fight History; Cricket Records Explainde | LSG Vs RCB | Gautam Gambhir

वादाचे मैदान:कधीकाळी गौतम गंभीरने कोहलीला दिला होता स्वतःचा 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्ड; आता का आहे दोघांत 36 चा आकडा?

स्पोर्ट्स डेस्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विराट कोहली व गौतम गंभीर या दोघांनीही टीम इंडियासाठी योगदान दिले आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा गौतम गंभीरने टीम इंडियात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. 2008 मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराटला वनडे सेंच्युरीला जवळपास वर्षभराची प्रतिक्षा करावी लागली होती.

डिसेंबर 2009 मध्ये विराटने श्रीलंकेविरोधात शतक ठोकले. या सामन्यात गौतम गंभीरने 150 धावांची खेळी केली होती. त्याची सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅचसाठी निवड करण्यात आली होती. सामना संपल्यानंतर जेव्हा त्याला हा पुरस्कार दिला गेला, तेव्हा त्याने आपला अवॉर्ड विराटला दिला.

हे दृश्य पाहून या दोन्ही खेळाडूंत भविष्यात चांगलीच गट्टी जमेल असे वाटत होते. पण असे झाले नाही. विराट व गंभीरची ऑनफील्ड फाइट पहिल्यांदा 2013 च्या आयपीएलमध्ये दिसून आली होती. तेव्हा विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार होता. तर गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करत होता. आता या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. आता गंभीर लखनऊ सुपरजॉयन्ट्सचा (एलएसजी) मेंटॉर असून, विराट आरसीबीचा स्टार क्रिकेटर आहे.

का आहे विराट व गंभीरमध्ये 36 चा आकडा?

असे म्हटले जाते की, गंभीरला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी फार आवडत नव्हता. तर विराट कोहली सुरुवातीपासूनच धोनीच्या लॉबीत राहिला. विराटची भारतीय संघातील जागा जसजशी बळकट होत गेली, तसतशी गंभीरची उंची छोटी होत गेली. असे मानले जाते की, याच कारणामुळे गंभीर किंग कोहलीवर राग करतो.

लखनऊत का झाला एवढा वाद?

लखनऊत सोमवारी आयपीएलच्या या हंगामातील आरसीबी व एलएसजीमध्ये दुसरा सामना झाला. या संघांत पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये झाला होता. तेव्हा एलएसजीने शेवटच्या चेंडूवर आरसीबीचा एका गड्याने पराभव केला होता. या सामन्यानंतर एलएसजीचा मेंटॉर गौतम गंभीरने एम चिन्नास्वामी स्टेडिअममधील प्रेक्षकांना तोंडावर बोट ठेवण्याचा इशारा केला होता.

सोमवारी लखनऊत आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीने त्याची पुनरावृत्ती केली. सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची वाढली. त्यानंतर ते दोघे एकमेकांना मारहाण करतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण अमित मिश्राने वेळीच हस्तक्षेप केल्याने स्थिती निवळली.