आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डिसेंबरमध्ये ख्रिसमस वगळता कुठलाही मोठा सण नसतानाही देशातील प्रमुख कार कंपन्यांच्या विक्रीत २० ते ८४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीच्या वार्षिक विक्रीत डिसेंबरमध्ये २०.२० टक्के वाढ झाली, तर दुसरी मोठी कार कंपनी ह्युंदाई मोटर्सच्या विक्रीत ३३.१४ टक्के वाढ दिसली. मारुती सुझुकीने डिसेंबरमध्ये एकूण १,६०,२२५ वाहने विकली. डिसेंबर २०१९ मध्ये ही संख्या १,३३,२९६ पर्यंत होती. याचप्रमाणे ह्युंदाई मोटर्सने डिसेंबरमध्ये ६६,७५० गाड्या विकल्या. एक वर्षाआधी डिसेंबरमध्ये हा आकडा ५०,१३५ होता. तसेच देशांतर्गत विक्रीत मारुतीने डिसेंबरमध्ये १,५०,२८८ वाहनांची विक्री केली. हे प्रमाण डिसेंबर २०१९ च्या तुलनेत १९.५ टक्के जास्त आहे. मागील वर्षी याच काळात १,२५,७३५ वाहने विकली होती. याचप्रमाणे ह्युंदाई मोटर्सची देशांतर्गत विक्री २४.८९ टक्क्यांनी वाढली.
टाटा मोटर्सच्या वाहनांत ८४% वाढ
टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत डिसेंबरमध्ये ८४% वाढ झाली आहे. कंपनीने २३,५४५ वाहने विकली. डिसेंबर २०१९ मध्ये हा आकडा १२,७८५ होता. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत टाटा मोटर्सची प्रवासी वाहनांची विक्री ८९ टक्क्यांनी वाढत ६८,८०३ पोहोचली, जी २०१९ च्या समान तिमाहीत ३६,३५४ होती.
महिंद्राच्या विक्रीत तीन टक्के वाढ
महिंद्रा अँड महिंद्राच्या प्रवासी वाहनांच्या डिसेंबर २०२० मधील विक्रीत तीन टक्के वाढ झाल्याने विक्री झालेल्या वाहनांची संख्या १६,१८२ वर पोहोचली आहे.
ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान मागणी कायम राहिल्याने वाहनांची विक्री वाढली आहे. लोक प्रवासासाठी खासगी वाहनाला पसंती देत आहेत. या कारणामुळेही वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ दिसत आहे. - शैलेश चंद्र, अध्यक्ष, पीव्ही बिझनेस, टाटा मोटर्स
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.