आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकी कार कंपनी फोर्ड मोटर्स भारतातील कारखाना बंद करणार आहे. मात्र, देशात मस्टँगसारखे हायएंड मॉडेल आयात होत राहतील. कंपनीने गुरुवारी याची घोषणा केली. भारतात फोर्डचे मॅन्युफॅक्चरिंग बंद झाल्याने त्यातील ४ हजार जणांचा रोजगार हिरावला जाणार आहे. फोर्ड गुजरातच्या साणंद आणि चेन्नईतील कारखाना बंद करत आहे. कंपनीने या प्लांट्समध्ये सुमारे १८३५० काेटींची गुंतवणूक केलेली आहे. उत्पादित वाहने विकल्यानंतर भारतात तयार होणारे मॉडेल फिगो, अॅस्पायर, फ्रीस्टाइल, इकोस्पोर्ट व एंडेव्हरची विक्री बंद होईल. जनरल मोटर्सनंतर भारतात कारखाना बंद करणारी फोर्ड दुसरी अमेरिकी कार कंपनी आहे. जनरल मोटर्सने २०१७ मध्ये भारतातून गाशा गुंडाळला होता. भारतात फोर्डची विक्री सातत्याने घटत आहे. फाडाच्या सूत्रांनुसार, ऑगस्टमध्ये फोर्ड इंडियाचा भारतीय कार बाजारातील वाटा १.४२% उरला. वर्षभरापूर्वी तो १.९% होता.
पण सुटे भाग मिळतील
कंपनीने म्हटले की, ज्यांच्याकडे फोर्डच्या कार आहेत, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. त्यांना सेवा आणि सुटे भाग मिळत राहतील. दिल्ली, चेन्नई, मुंबई, साणंद आणि कोलकात्यात कंपनीचे सुट्या भागांचे डेपो सुरू राहतील, असे कंपनीने आश्वासित केले.
फोर्डच्या डीलर्सची २००० कोटी रुपयांची गुंतवणूक
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (फाडा) म्हटले की,फोर्डच्या या निर्णयाने डीलर्सचे नुकसान होईल. डीलर्सनी सेल्स नेटवर्कमध्ये २००० कोटी रु. गुंतवले आहेत. फोर्डचे १७० डीलर आहेत, त्यांचे ३९१ शोरूम आहेत. या डीलर्सकडे १५० कोटी रु. च्या हजार कार आहेत. या नेटवर्कमध्ये ४० हजार लोक काम करतात. फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटींनी सांगितले की, फोर्ड २०१७ नंतर ५ वी ऑटोमोबाइल कंपनी आहे, जिने भारतात निर्मिती बंद केली आहे. याआधी जनरल मोटर्स, मॅन ट्रक्स, हार्ले डेव्हिडसन, यूएम लोहियाने निर्मिती बंद केली आहे.
देशात २०१८ पर्यंत १० लाख कार विकल्या होत्या
फोर्ड इंडियाला एक दशकात १४,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले. त्याचे मुख्य कारण मारुती सुझुकीसारख्या देशी कंपन्यांच्या स्वस्त कार. फोर्डने भारतात १९९५ मध्ये महिंद्राशी भागीदारी करून प्रवेश केला होता. फोर्डने जुलै २०१८ पर्यंत देशात १० लाख कार विकल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.