अनोखा मोर्चा / पाण्यासाठी महिलांचा रिकाम्या हंड्यांनी गरबा

Oct 07,2019 7:14 PM IST

पुणे - दसऱ्याचा सण तोंडावर असताना घरात पाण्याचा थेंबही नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या दीड वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याचा निषेध म्हणून बोपोडीतील महिलांनी सोमवारी महापालिकेवर हंडामोर्चा काढत पालिकेच्या आवारात रिकाम्या हंड्यानी दांडिया खेळला. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी हा हंडामोर्चा थांबवला. आचारसंहितेमुळे महापालिका प्रशासनाचे नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचाच फटका नागरिकांना बसत असून अनेक रस्त्यांना खड्डे पडलेत, तर अनेक भागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी बोपोडीतील महिलांनी थेट महापालिकेवर हल्लाबोल केला.