आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आकर्षण:विदर्भाचे काश्मीर - चिखलदऱ्यात काचेचा स्काय वॉक; स्वित्झर्लंड व चीनच्या दोन पावले पुढे, जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक, 1500 फूट उंची

अमरावती (जयंत सोनोने)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या स्कायवॉकची उंची शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 1 हजार 500 फूट राहणार आहे.

भारतातील नागरिकांना लवकरच काचेच्या स्कायवॉकवरून चालण्याचा अनुभव घेता येणार आहे. विदर्भाचे काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा येथे हा स्कायवॉक उभा होत असून त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

या स्कायवॉकची उंची शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल १ हजार ५०० फूट राहणार आहे. आतापर्यंत जगात स्वित्झर्लंड तसेच चीनमध्ये स्कायवॉक तयार करण्यात आला आहे. मात्र भारतातील हा स्कायवॉक सर्वाधिक लांबीचा असणार आहे. स्वित्झर्लंडमधील स्कायवॉक ३९७ मीटरचा आहे, तर चीनचा ३६० मीटरचा आहे. त्यामुळे चिखलदरा येथे होत असलेला हा ५०० मीटरचा स्कायवॉक जगातील तिसरा असून जगातील तो सर्वात मोठा आहे.

महाबळेश्वर, माथेरानसारखे हिल स्टेशन असलेल्या चिखलदरा येथे स्कायवॉक सुविधा लवकरच पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्कायवॉकचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हे एक विशेष आकर्षण असणार असून चिखलदऱ्यातील गोराघाट पॉइंटपासून ते हरिकेन पॉइंटपर्यंत स्कायवॉक प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू आहे. भारतातील पहिला आणि जगातील तिसरा हा गगनचुंबी पूल आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्कायवॉकने जोडण्यात येईल. हा स्कायवॉक पूर्णपणे काचेचा आहे, त्यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. स्कायवॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल.

काळजाचा ठोका चुकणार
जगात दोन देशांमध्ये स्कायवॉक असले तरी सर्वात जास्त लांबीचा पहिला स्कायवॉक चिखलदऱ्यात तयार होत आहे. भारतातील हा पहिलाच स्कायवॉक असून संपूर्णपणे काचेच्या या स्कायवॉकवरून चालताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकणार आहे. तब्बल १ हजार ५०० फुटांच्या उंचीवरून मेळघाटाचे निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवण्याची संधी या निमित्ताने पर्यटकांना मिळणार आहे.

लांबलेले काम लागले मार्गी
सिडकोचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जामनेरकर यांनी सांगितले, जगात स्वित्झर्लंड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे. चिखलदरा येथे होत असलेला हा ५०० मीटरचा स्कायवॉक जगातील तिसरा असला तरी तो विश्वात सर्वांत मोठा आहे. या स्कायवॉकचे बजेट ३४ कोटी रुपयांचे असून दोन वर्षांत तो पूर्ण होणे अपेक्षित अाहे. कोरोनामुळे यंदाच्या वर्षात स्कायवॉकची अनेक कामे रखडलेली होती. मात्र अनलॉक होताच सर्व कामे मार्गी लागली आहेत.

जोडीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पही
येथे असलेल्या गाविलगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून भीमकुंड, कीचकदरी येथे पर्यटकांची गर्दी असते. पंचबोल पॉइंट व सनसेट पॉइंटसुद्धा पर्यटकांच्या आकर्षणाचे विषय असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने येथील सौंदर्याला चार चाँद लावले आहेत. त्यातच आता स्कायवॉकच्या निर्मितीने चिखलदऱ्याच्या आकर्षणात अधिकच भर पडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...