- Marathi News
- National
- India Military Ready For China
चीनचा धोका वेळीच ओळखा!
- कॉपी लिंक
1962 मध्ये भारतावर चीनने केलेल्या आक्रमणाच्या घटनेचे यंदा पन्नासावे वर्ष सुरू आहे. या युद्धापासून आपण काय बोध घेतला? सध्या आपले चीनशी हिंदी-चिनी भाई-भाई संबंध आहेत की चीनशी पुन्हा एकदा लढाई होणार आहे? तसे झाल्यास आपले सरकार व लष्कर कितपत कार्यक्षम आहे? वास्तविक पाहता 1962 च्या युद्धात भारताच्या केवळ 10 टक्के सैन्याने भाग घेतला होता. हवाई दल व नौदल यांचा अजिबात वापर केला नव्हता. गेल्या 7-8 वर्षांत चीन सीमेवरची परिस्थिती गंभीर होत आहे. चिनी सैन्याचे रस्ते (मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेच्या आकाराचे) आपल्या सीमेपर्यंत येऊन ठेपलेले आहेत. पण भारतामध्ये सीमेच्या 50-60 कि.मी. इतक्या दूर अंतर मागे रस्ते आहेत. सीमेलगत जे काही रस्ते आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. आपले पर्यावरण मंत्रालय उत्तम रस्ते बनवायला परवानगी देत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, 1962 सालापासून आजपर्यंत भारतीय लष्कराच्या केवळ 8-10 डिव्हिजन चिनी सीमेवर तैनात आहेत. (1.2-1.5 लाख सैन्य) या उलट चीनने भारतीय सीमेलगत 40 -45 डिव्हिजन्स (6 ते 7.5 लाख सैनिक) तैनात केल्या आहेत. म्हणजेच आपल्यापेक्षा चौपट सैन्यशक्ती चीनकडे आहे. ह्याच्या जोडीला चिनी रस्ते तिबेटमधून भारतीय सीमेपर्यंत पोहोचले आहेत. आपले रस्ते मात्र सीमेपासून 50-60 कि.मी. दूर आहेत, म्हणजेच सीमेवर लढत असलेल्या सैन्याला जलदीने रसद पोहोचवण्यास आपण अजूनही असमर्थ राहणार आहोत. शिवाय चीनने रेल्वेलाइनचे जाळे तिबेटमध्ये पूर्ण पसरले आहे व पेट्रोलियम प्रॉडक्टकरिता मोठी पाइपलाइनसुद्धा तयार केली आहे. ह्याउलट भारतीय रेल आसामच्या ब्रह्मपुत्रेच्या पात्रातच म्हणजे सीमेपासून शेकडो कि.मी. मागे रुतून राहिली आहे. थोडक्यात, चीनने लष्करी कारवायांसाठी सर्व योग्य त्या सुविधांचे जाळे तयार करून ठेवले आहे. आपले सरकार अजून ह्या बाबतीत गाफीलच आहे. निव्वळ घोषणाबाजी करून काही लष्करी तयारी होत नाही. 1972 च्या बांगलादेश युद्धानंतर पस्तीस वर्षे झाल्यावर भारताने 2010 मध्ये दोन नवीन लष्करी डिव्हिजन उभारल्या (अंदाजे 30,000-35,000 सैनिक); पण अजूनही त्या सैनिकांना योग्य शस्त्रे (हलक्या तोफा) मिळाल्या नाहीत. भारत सरकारने ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चौथी रेजिमेंट अरुणाचलमध्ये तैनात केली आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या सीमेवर अशाच तीन रेजिमेंट आधीच तैनात आहेत; पण चीनलगतच्या सीमा भागात असा निर्णय घेण्याची गरज आताच का भासली? दरम्यान, पंतप्रधानांनी लष्कराला दोन नव्या डिव्हिजन्स उभारण्याची परवानगी दिली आहे. (अंदाजे 90,000 सैनिकांची वाढ). आपल्या लष्करी इतिहासात एका झटक्यात इतकी वाढ कधीच झालेली नाही. लष्करी जवानांच्या संख्येत वाढ करण्याच्या प्रक्रियेवर किमान 65,000 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. या घोषणा अद्यापतरी कागदोपत्रीच आहेत कारण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने (उउढअ) अजून या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही तसेच अर्थमंत्र्यांनी यासाठी निधीचीही तरतूद केलेली नाही. भारतीय लष्करातील नवीन भरती झालेले हे जवान पूर्ण क्षमतेने कार्यरत व्हायला अजून 7 -10 वर्षे लागतील व रस्ते सीमेपर्यंत पोहोचायला किमान 15 वर्षे लागतील. चिनी डॅ्रगन याची वाट पाहत बसणार आहे का? सध्या चीन व पाकिस्तान यांच्यात घनिष्ठ संबंध जर लक्षात घेतले तर आगामी काळात आपल्या देशाला एकाच वेळी दोन्ही सीमांवर युद्ध करण्याची पाळी येऊ शकते. चिनी लष्कराने पाकिस्तानच्या उत्तर भागात आपले पाय पसरले आहेत. त्याचबरोबर ईशान्य भारतात त्याची लुडबूड सुरूच आहे. अंतर्गत सुरक्षेकडे जर सरकारने दुर्लक्ष केले तर आपण सक्षमतेने शत्रूचा सामना कसा करणार? चीनशी युद्ध होईल वा न होईल; पण आधी देशातल्या नक्षलवाद आणि दहशतवादासारख्या गंभीर समस्यांवर उपाय शोधायला हवा, नाहीतर एकाच वेळेस आपल्याला दोन-दोन आघाड्यांवर लढावे लागेल. सद्य:स्थितीत आपण केवळ आपले रक्षण करू शकतो; पण चीनने हडप केलेला प्रदेश सोडवू शकणार नाही.












