Wed, Nov 25, 2026Updated 09:16 PM IST

हिंगोली उत्पादन शुल्क विभागाचा कारभार वाऱ्यावर:सहा महिन्यांपासून अधीक्षक नाही, अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष; महसूल वसुलीही पिछाडीवर

हिंगोली2 तासांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा हिंगोली जिल्ह्यातील कारभार सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विभागाला कायमस्वरूपी अधीक्षक नसल्याने जिल्ह्याचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या

.

हिंगोली जिल्ह्यात देशी दारूची 49, तर बिअरबारची 209 दुकाने असून, याशिवाय परमिट रूमही आहेत. या दुकानांच्या परवाना नूतनीकरणातून, नवीन परवाने देण्यातून तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. चालू आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला मार्च अखेरपर्यंत 7.27 कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, आठ महिने उलटूनही विभागाला केवळ 88 लाख रुपयांचाच महसूल जमा करता आला आहे. त्यामुळे महसूल वसुलीचा वेग आणि विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

जुलैपासून अधीक्षकपद रिक्त

उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षकपद जुलै महिन्यापासून रिक्त आहे. सुरुवातीला हिंगोलीचा अतिरिक्त पदभार नांदेड येथील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून लातूर येथील अधिकाऱ्यांकडे हा पदभार देण्यात आला आहे. मात्र, संबंधित अधिकारी आठवड्यातून दोन वेळाच हिंगोलीत येत असल्याने उर्वरित दिवस कार्यालयाचा कारभार स्थानिक कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू असतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती नसल्याने कामकाजाचा आढावा, कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे पद रिक्त ठेवून अतिरिक्त पदभारावर कारभार चालविण्याची वेळ विभागावर का आली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट

एकीकडे परवानाधारक व्यवसायातून महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट असताना दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा प्रश्न गंभीर बनत आहे. अनेक गावांमध्ये विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. अशा ठिकाणी नियमित तपासणी करून कारवाई करण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची असतानाही त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची चर्चा आहे. अवैध दारू विक्री रोखण्याऐवजी या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

अवैध दारू विक्रीचा विषय समोर आल्यानंतर अनेकदा पोलिस विभागाकडे बोट दाखवले जाते. मात्र, उत्पादन शुल्क विभागाचीही यामध्ये तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई, परवानाधारक दुकानांची तपासणी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई यासाठी स्वतंत्र यंत्रणा असतानाही प्रत्यक्षात प्रभावी नियंत्रण दिसत नसल्याचे चित्र आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती नसल्याने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख कोण ठेवणार, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.

चार महिन्यांत 6.39 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान

मार्च अखेरपर्यंत 7.27 कोटी रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे असताना आठ महिन्यांत केवळ 88 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे उर्वरित चार महिन्यांत विभागाला आणखी 6.39 कोटी रुपयांचा महसूल जमा करावा लागणार आहे. एवढ्या कमी कालावधीत मोठे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाला महसूल वसुलीचा वेग वाढवावा लागणार आहे. मात्र, जिल्ह्यात कायमस्वरूपी अधीक्षक नसताना या कामांचे नियोजन आणि आढावा कसा घेतला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या विभागाला कायमस्वरूपी अधिकारी मिळत नसणे, ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रीवर प्रभावी नियंत्रण नसणे आणि महसूल वसुलीचे उद्दिष्ट पिछाडीवर राहणे, या सर्व बाबी चिंताजनक आहेत. त्यामुळे शासनाने हिंगोलीत तातडीने कायमस्वरूपी अधीक्षक नियुक्त करावा आणि विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन अवैध दारू विक्रीविरोधात ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी?

हिंगोली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू झाल्यापासून काही कर्मचारी एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा आहे. काही कर्मचारी ज्येष्ठता यादीतून नाव कमी होण्यासाठी लगतच्या जिल्ह्यात एक-दोन वर्षे बदली करून घेतात आणि त्यानंतर पुन्हा हिंगोलीत नियुक्ती मिळवतात, असा आरोप केला जात आहे. या प्रकारामागे संबंधित कर्मचाऱ्यांना कोणाचे अभय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

एकाच कार्यालयात दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने काही कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्याचीही चर्चा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी होणार आणि त्यांच्या कामकाजाची चौकशी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links