- Marathi News
- Local
- Maharashtra
- Jalgaon
- Gulabrao Patil Slams Sanjay Raut; Are You Central Bank Manager?
150 कोटींचा भाव मोजायला संजय राऊतच गेले होते का?:ते काय सेंट्रल बँकेचे मॅनेजर आहेत? मंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला
- कॉपी लिंक

डिलिमिटेशन विधेयकाच्या निमित्ताने खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी 150 कोटी रुपयांचा भाव लावला जात असल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या खासदार संजय राऊत यांचा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. "
संजय राऊत सेंट्रल बँकेचे मॅनेजर आहेत का?
डिलिमिटेशनच्या (मतदारसंघ पुनर्रचना) मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर गुलाबराव पाटील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी खासदारांना 150 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केल्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले की, "मग हेच पैसे मोजायला गेले होते का? हे सेंट्रल बँकेचे मॅनेजर आहेत का?" असा प्रतिप्रश्न करत त्यांनी राऊतांचे आरोप हसण्यावर नेले.
सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर भाष्य
डिलिमिटेशनचे विधेयक संसदेत प्रत्यक्ष समोर आल्यानंतरच त्याबाबत सविस्तर भूमिका घेऊ, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना, "तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. डिलिमिटेशनच्या बाजूने राहायचे की नाही, हा निर्णय शेवटी त्यांचा पक्ष घेईल आणि ते सर्वांना समजेल," असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
किशोर आप्पांना त्यांची 'डबल अक्कल' लखलाभ; खडसेंना 29 तारखेला बघून घेऊ!
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेनंतर गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. मात्र, किशोर पाटील यांनी 'आम्हाला कोणी अक्कल शिकवू नये, आमच्या मुलाला डबल अक्कल आहे' असे म्हणत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. यावर गुलाबराव पाटील यांनी तीव्र नाराजी व उपरोध व्यक्त केला:
अक्कल शिकवण्याच्या विधानावर पलटवार
मी दोघांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता, हे माझे भाषण ऐकणाऱ्या सर्वांना आणि संपूर्ण जगाला माहीत आहे. जर किशोर आप्पा पाटलांना वाटत असेल की कोणी त्यांना अक्कल शिकवू नये, तर त्यांची ही 'डबल अक्कल' त्यांनाच लखलाभ असो. शेवटी तो त्यांचा मुलगा आहे, त्यांनी कोणाचे समर्थन करावे किंवा करू नये आणि मुख्यमंत्र्यांना भेटावे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे.
एकनाथ खडसेंना थेट आव्हान
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात 'घोडा मैदान जवळ आहे' असे म्हणणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. "येत्या 29 तारखेला निकाल काय लागतो ते बघून घ्या ना, आमच्या जागा निवडून आल्यावर सगळे कळेल," असे थेट आव्हान त्यांनी दिले.
आनंदराज आंबेडकरांची जीभ घसरली
राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका मांडली. दिवंगत नेते अजित पवार यांच्याबद्दल बोलताना आनंदराज आंबेडकर यांची निश्चितच जीभ घसरली आहे. कदाचित त्यांच्या मनात तसा वाईट भाव नसावा किंवा माध्यमांतून वेगळे दाखवले गेले असावे; पण असे अनावधानाने घडले असेल, तर आनंदराज आंबेडकर यांनी दिलगिरी व्यक्त करायला काहीच हरकत नाही, असे पाटील म्हणाले.
मुलींच्या स्वसंरक्षणावर बाळासाहेबांच्या विचारांची आठवण
तरुणींनी स्वसंरक्षणासाठी कट्यारी किंवा घरोघरी तलवारी वाटण्याच्या विधानावर बोलताना पाटील म्हणाले की, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, मुलींनी आपल्या पर्समध्ये लिपस्टिक ठेवण्यापेक्षा मिरची पूड ठेवली पाहिजे. सध्या मुलींची छेडछाड आणि त्रासाचे प्रकार वाढल्याने मुलींनी स्वसंरक्षणाची काळजी घेणे ही काळाची गरज आहे; मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये."
मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई
यंदा पाऊस पडला असला तरी मराठवाड्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि अहिल्यानगर या भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे टँकरची संख्या वाढत असल्याचे पाणीपुरवठा मंत्री या नात्याने त्यांनी मान्य केले.
--------------------------------------------
हेही वाचा…
डिलिमिटेशनसाठी 150 कोटींचे आरोप बालिशपणाचे, मग सुळेंनाही पैसे दिले का?: आरोप खोटे निघाल्यास नार्वेकर राऊतांना समज देतील- संजय शिरसाट

राहुल नार्वेकरांनी जबरदस्तीने काही जमिनी बळकावल्या असल्याच्या तक्रारी जर संजय राऊत यांच्याकडे आल्या असतील आणि त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असेल, तर मुख्यमंत्री त्यावर नक्कीच चौकशी करतील. परंतु, हे आरोप खोटे निघाले, तर नार्वेकर हे स्वतः वकील आहेत, ते राऊतांना योग्य ती समज देतील, असे प्रत्युत्तर मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी












