- Marathi News
- Local
- Maharashtra
- Mumbai
- Three And A Half Thousand Anganwadis In The State Will Be 'smart', With E learning, Water Purifiers And Modern Kitchens
राज्यामधील साडेतीन हजार अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’:ई-लर्निंग, वॉटर प्युरिफायर व आधुनिक स्वयंपाकघर
- कॉपी लिंक

ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब कुटुंबांतील मुलांना आता महागड्या खासगी प्ले-स्कूलच्या धर्तीवर शिक्षण मिळणार आहे. राज्यातील ३,८३२ अंगणवाडी केंद्रांचे “स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये रूपांतर करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या केंद्रांमध्ये ई-लर्निंग साधने, आधुनिक स्वयंपाकघर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
केवळ पोषण आहार नाही, तर डिजिटल शिक्षणाचा पाया
आतापर्यंत अंगणवाड्यांची ओळख केवळ ‘खिचडी आणि पोषण आहार वाटप केंद्र’ अशीच राहिली होती. मात्र, या निर्णयामुळे अंगणवाड्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. ई-लर्निंग हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमुळे ० ते ६ वयोगटातील मुलांना खेळातून आणि डिजिटल माध्यमातून प्राथमिक शिक्षण मिळेल. यामुळे ग्रामीण भागातील मुलेही पहिल्या दिवसापासून तंत्रज्ञानाशी जोडली जातील, असेही सांगण्यात आले.
अनेक अंगणवाड्या आजही मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या ठिकाणी चालतात. सरकारने या योजनेसाठी ‘सरकारी जागा आणि वीज जोडणी’ही अट घातली आहे.
सामान्य पालक व मुलांना याचा काय फायदा?
या योजनेचा लाभ नेमका कोणाला - या स्मार्ट अंगणवाड्यांचा थेट फायदा ० ते ६ वयोगटातील लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना होणार आहे. सर्वच अंगणवाड्या स्मार्ट होणार? - नाही. पहिल्या टप्प्यात ज्या अंगणवाड्या स्वतःच्या (सरकारी) जागेवर आहेत आणि जिथे वीज जोडणी उपलब्ध आहे अशा ३,८३२ अंगणवाड्यांची निवड. स्मार्ट अंगणवाडीत नेमक्या कोणत्या नवीन सुविधा असतील? - यात ई-लर्निंगसाठी टीव्ही/संगणक संच, स्वच्छ पिण्यासाठी वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी स्वतंत्र बेसिन, स्वच्छ भारत किट, आधुनिक स्वयंपाकघर आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा असेल.












