- Marathi News
- Local
- Maharashtra
- Dhule Jail Superintendent Eknath Shinde Passes Away | Heart Attack
धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन:3 महिन्यांनी होणार होते निवृत्त
- कॉपी लिंक

धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एकनाथ शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रविवारी (23 नोव्हेंबर) संध्याकाळी शासकीय निवासस्थानी असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे दिवसभरातील कामकाज आटोपून संध्याकाळच्या सुमारास आपल्या शासकीय निवासस्थानी परतले होते. याचदरम्यान अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच निवासस्थानी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू होण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समोर येताच कारागृह विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
1997 मध्ये कारागृह विभागात सेवेला सुरुवात
एकनाथ शिंदे यांनी 1997 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात आपल्या शासकीय सेवेची सुरुवात केली होती. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी कारागृह प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. कामाचा अनुभव आणि प्रशासकीय जबाबदारी लक्षात घेऊन डिसेंबर 2020 मध्ये त्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी धुळे जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली.
धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम करताना कारागृहातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज, बंदिवानांशी संबंधित प्रक्रिया तसेच विभागाच्या विविध जबाबदाऱ्यांचे त्यांनी व्यवस्थापन केले. महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाच्या अधिकृत नोंदींनुसार, ते धुळे जिल्हा कारागृहात अधीक्षक आणि अपील अधिकारी म्हणून कार्यरत होते.
न्यायबंद्यांच्या कुटुंबीयांसाठी कायदेविषयक मदत कक्ष
कारागृहातील प्रशासकीय कामकाजाबरोबरच न्यायबंद्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कायदेविषयक मदत मिळावी, यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने धुळे कारागृहात कायदेविषयक मदत कक्ष सुरू करण्यात आला होता. या कक्षाच्या स्थापनेत एकनाथ शिंदे यांचा सक्रिय सहभाग होता. या माध्यमातून न्यायबंद्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन मिळण्यास मदत होत होती.
निवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक
एकनाथ शिंदे यांच्या शासकीय सेवेला आता पूर्णविराम मिळण्यासाठी अवघे तीन महिने शिल्लक होते. दीर्घकाळ कारागृह विभागात सेवा बजावल्यानंतर ते लवकरच निवृत्त होणार होते. मात्र, निवृत्तीपूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अचानक झालेल्या या निधनामुळे त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. धुळे जिल्हा कारागृह प्रशासनासह पोलीस दलात त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा….
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला पक्षातूनच विरोधाची चर्चा:खासदार अमर काळेंचा मात्र पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात सध्या अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना काहीसा विराम मिळाल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर पुकारलेल्या 'न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चा'वरून पक्षांतर्गत मतभेद समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी रोहित पवार यांच्या मोर्चाला जाहीरपणे पाठिंबा दर्शविल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे वेधले गेले आहे. सविस्तर वाचा….












