- Marathi News
- Local
- Maharashtra
- Maharashtra Revenue Department Launches 9 New Tehsildar Offices | 6 Districts
नागरिकांची महसूल कामांसाठी होणारी धावपळ थांबणार:राज्यात 9 नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू होणार, 6 जिल्ह्यांना लाभ
- कॉपी लिंक

महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागू नये आणि स्थानिक पातळीवरच महसुली सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात 9 नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
नागपूर आणि नाशिक विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये ही नवीन कार्यालये सुरू केली जाणार आहेत. यामध्ये नागपूर, गडचिरोली, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. या कार्यालयांमुळे संबंधित भागातील नागरिकांना जमिनीशी संबंधित आणि अन्य महसुली कामांसाठी लांबचा प्रवास करण्याची गरज कमी होणार आहे.
नागपूर विभागात सावनेर तालुक्यासाठी मौजे चिचोली (खापरखेडा) येथे अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथेही नवीन कार्यालय स्थापन केले जाणार आहे. नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे कार्यालय सुरू होईल. जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर, जामनेर तालुक्यातील पहूर आणि चाळीसगाव या तीन ठिकाणी नवीन अपर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित केली जाणार आहेत.
याशिवाय नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार आणि शहादा येथे, तर धुळे जिल्ह्यात शिरपूर शहरात नवीन अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना महसूल विभागाच्या कामांसाठी अधिक जवळच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होतील.
महसुली कामांसाठी स्वतंत्र अधिकार
नवीन अपर तहसीलदार कार्यालयांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील महसुली अधिकार आणि कामकाजाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे जमीन, महसूल आणि संबंधित प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना मूळ तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता कमी होईल. स्थानिक पातळीवरच अर्ज, कागदपत्रे आणि महसुली कामांची प्रक्रिया पार पाडणे शक्य होणार आहे.
मात्र, निवडणूक, संजय गांधी निराधार योजना तसेच इतर बिगरमहसुली स्वरूपाची कामे पूर्वीप्रमाणेच मूळ तहसीलदार कार्यालयामार्फत केली जाणार आहेत. अशा स्वरूपाचे अर्ज किंवा निवेदने नवीन अपर तहसीलदार कार्यालयात प्राप्त झाल्यास ते पुढील कार्यवाहीसाठी मूळ तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.
नागरिकांची धावपळ कमी करण्यावर भर
राज्यातील महसूल प्रशासन अधिक गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विविध भागांत नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाजाचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना स्थानिक पातळीवर सेवा उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. नवीन कार्यालयांमुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यास मदत होईल. तसेच महसूल विभागाशी संबंधित कामांमध्ये सुलभता येऊन सेवा अधिक जलद आणि पारदर्शकपणे मिळण्यास हातभार लागणार आहे.
"गतिमान प्रशासनासाठी राज्यातील विविध भागांत नवीन अपर तहसीलदार कार्यालयांची उभारणी आणि प्रत्यक्ष कामकाजाची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्यात येत आहे. या निर्णयामुळे जमिनीशी व महसुलाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांना आळा बसेल आणि त्यांना आपल्या भागातच जलद व पारदर्शक सेवा मिळू शकतील," असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.












