- Marathi News
- Local
- Maharashtra
- Sant Rohidas Skill Training Program Launch; Maharashtra Youth Job Skills
युवकांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाला नवे नाव:STEP कार्यक्रम आता ‘संत रोहिदास अल्पमुदतीचा रोजगारक्षम अभ्यासक्रम’ म्हणून ओळखला जाणार
- कॉपी लिंक

राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमाचे नामकरण आता ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेऊन STEP कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पारंपरिक व्यावसायिक प्रशिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, HVAC आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रांमध्ये युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार आयटीआयमधील विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी हे अभ्यासक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. केवळ पदवी शिक्षण घेणे पुरेसे नसून, त्यासोबत कौशल्य विकास आणि कौशल्यवृद्धी करणेही आवश्यक आहे. त्यातून युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण किंवा नोकरी करतानाही प्रशिक्षण घेता यावे, यासाठी दोन, तीन किंवा चार तासांचे प्रमाणित कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात उद्योगांच्या गरजांनुसार आधुनिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये STEP अर्थात अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ 8 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. पहिल्या टप्प्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर या कार्यक्रमाचा पुढील टप्प्यांमध्ये विस्तार करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात 51 हजारांहून अधिक प्रवेश
STEP कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 414 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि 122 शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रांचा (GTHS) समावेश करण्यात आला होता. या टप्प्यात एकूण 1,766 प्रशिक्षण तुकड्या सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये 51,042 प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला. यापैकी 37,981 प्रशिक्षणार्थींचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी जिल्हा नियोजन निधीचा वापर करण्यात आला. या टप्प्यात एकूण 88 प्रशिक्षण तुकड्यांना मंजुरी देण्यात आली असून, 1,844 प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे. त्यापैकी 59 प्रशिक्षण तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यात 884 प्रशिक्षण तुकड्या
कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 56 शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रांमधील 67 प्रशिक्षण तुकड्या आणि 346 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील 817 प्रशिक्षण तुकड्या निश्चित करण्यात आल्या आहेत. अशा एकूण 884 प्रशिक्षण तुकड्यांच्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या टप्प्यासाठी 26,520 प्रशिक्षण प्रवेश क्षमता उपलब्ध करून देण्यात आली असून, आतापर्यंत 18,266 प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे. या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी दक्ष (DAKSH) निधीतून तरतूद करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर दक्ष प्रकल्पांतर्गत निधीची मागणी केली जाणार आहे.
महिलांच्या कौशल्य विकासासाठी विशेष अभ्यासक्रम
महिलांनाही रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत विशेष अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात 260 प्रशिक्षण तुकड्यांच्या माध्यमातून 7,234 महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची संधी देण्यात आली. यामध्ये सेमीकंडक्टर टेक्निशियन, ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि ब्युटी थेरपिस्ट यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. पारंपरिक कौशल्य प्रशिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन महिलांची रोजगारक्षमता वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून प्रात्यक्षिकांवर भर द्या : मनीषा वर्मा
अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी प्रशिक्षणार्थींना पहिल्या दिवसापासून कच्च्या मालासह प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्याच्या सूचना केल्या. अल्पमुदतीच्या रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आवश्यक कच्चा माल आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रत्येक आयटीआयच्या प्राचार्यांनी घ्यावी. प्रशिक्षणादरम्यान कोणतीही कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात 26 हजारांहून अधिक प्रवेशक्षमता निर्माण झाली असून, आतापर्यंत 18 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमात विद्यार्थिनींचाही लक्षणीय सहभाग आहे. पहिल्या टप्प्यात 12 हजार विद्यार्थ्यांना, तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पुढील टप्प्यात सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळाली. अध्यापकवर्ग आणि बाह्य तज्ज्ञांच्या सहभागातून अशा प्रकारचे अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आयटीआयचा ब्रँड अधिक उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनीही दीक्षांत समारंभात याबाबत अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित कौशल्यात प्रावीण्य मिळवून देण्यासाठी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे महत्त्वाचे आहे, असे वर्मा म्हणाल्या.
या कार्यक्रमाच्या ऑनलाइन शुभारंभप्रसंगी अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त डॉ. अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी तसेच राज्यातील 400 आयटीआयचे प्राचार्य उपस्थित होते.
पारंपरिक कौशल्य प्रशिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांचा कौशल्य विकास साधणे आणि उद्योगांच्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून राज्यातील युवकांची रोजगारक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
हेही वाचा….
नगरपालिकांच्या विकासासाठी निधीची तरतूद करणार:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारीही घेणार, एकनाथ शिंदेंची घोषणा

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या विकासकामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. नागपूरमध्ये राज्यातील नगराध्यक्षांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी छोट्या शहरांच्या विकासासाठी विविध विभागांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नगरपालिकांच्या हद्दीत मुलांसाठी खेळाची मैदाने विकसित करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाही मदतीचा हात देण्यात येणार असून, त्यांच्या मुलींच्या रखडलेल्या लग्नांची जबाबदारी घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. सविस्तर वाचा….












