- Marathi News
- Local
- Maharashtra
- Manoj Jarange Patil Maharashtra Tour; Maratha Reservation Issues Visit
7 डिसेंबरपासून मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यावर:4 ते 5 टप्प्यांत सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांच्या समस्या जाणून घेणार
- कॉपी लिंक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी, कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न मिळणे आणि कास्ट व्हॅलिडिटी प्रक्रियेत निर्म
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन सुरू असतानाच समाजातील अनेक विद्यार्थी, नोकरीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार आणि नागरिकांना आरक्षणाच्या लाभासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः कुणबी नोंदी उपलब्ध असूनही संबंधितांना प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही कास्ट व्हॅलिडिटी मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केवळ आंदोलनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष जिल्ह्यांमध्ये जाऊन या समस्यांची माहिती घेण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला आहे.
या दौऱ्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी एक दिवस राखून ठेवण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यातील मराठा बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील. विशेषतः ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा नागरिकांच्या प्रकरणांची माहिती घेतली जाणार आहे. तसेच हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे किंवा नाही, प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना कोणत्या अडचणी येत आहेत आणि प्रशासनाकडून काय प्रतिसाद मिळत आहे, याचाही आढावा घेतला जाणार आहे.
1 डिसेंबरला दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर
मनोज जरांगे पाटील यांच्या या महाराष्ट्र दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम 1 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्याच्या दृष्टीने दौऱ्याचे चार ते पाच टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना आपापल्या समस्या मांडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र, नोंदींची पडताळणी आणि कास्ट व्हॅलिडिटीसंदर्भात अडचणी असलेल्या मराठा बांधवांनी दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष भेटून आपली बाजू मांडावी, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
उपोषणानंतर आता प्रश्नांच्या सोडवणुकीवर भर
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान मागण्यांबाबत सरकारकडून अपेक्षित निर्णय होत नसल्याने त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकारकडून चर्चा आणि मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर सरकारला काही काळाची मुदत देत जरांगे यांनी उपोषण मागे घेतले होते.
मात्र, उपोषण मागे घेतले असले तरी मराठा समाजाच्या आरक्षणाशी संबंधित प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेले नाहीत. विशेषतः कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया आणि त्यानंतरच्या कागदपत्रांशी संबंधित अडचणी कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या प्रश्नांची माहिती घेण्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
यापूर्वीही मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात विविध ठिकाणी बैठका घेऊन मराठा समाजाशी संवाद साधला होता. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आता नव्या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यभरातील मराठा बांधवांच्या प्रमाणपत्रविषयक अडचणी समजून घेण्यावर त्यांचा भर असणार आहे. या दौऱ्यातून समोर येणाऱ्या तक्रारी आणि प्रश्नांवर पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा….
रोहित पवारांनी पहिला मोर्चा स्वतःच्या बारामती ॲग्रोवर काढावा:परिणय फुके यांचा हल्लाबोल; म्हणाले- तिथल्या शेतकऱ्यांचे थकीत पैसे आधी द्यावेत

हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चा काढण्याची तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप नेते परिणय फुके यांनी सोमवारी (23 नोव्हेंबर ) नागपुरातून जोरदार निशाणा साधला. "रोहित पवारांना खरोखरच शेतकऱ्यांबद्दल कळवळा आणि संवेदनशीलता असेल, तर त्यांनी पहिला मोर्चा स्वतःच्या बारामती ॲग्रोवर काढावा; कारण बारामती ॲग्रोने अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. त्यांनी आधी तिथल्या शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत आणि उसाचे भाव वाढवून द्यावेत," असा सणसणीत टोला फुके यांनी लगावला. यासोबतच गोवारी समाजाच्या 32 व्या शहीद स्मृतिदिनानिमित्त बोलताना त्यांनी गोवारी आरक्षणाच्या लढ्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे (कॉन्स्टिट्यूशनल बेंच) दाद मागणार असल्याचे जाहीर केले आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीविरोधात मोठी कारवाई केल्याची माहिती दिली. सविस्तर वाचा…..












