- Marathi News
- Local
- Maharashtra
- Pune Court Attack Update | Mandar Kiwale Condition Critical In Sasoon
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यात मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक:पुढील 72 तास महत्त्वाचे, ससूनच्या डीननी दिली आरोग्याची माहिती
- कॉपी लिंक

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात मंगळवारी (25 नोव्हेंबर) दुपारी घडलेल्या हिंसक घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेरच एका तरुणाला लक्ष्य करत हल्लेखोरांनी आधी गोळीबार करण्याचा प्र
या हल्ल्यात जखमी झालेल्या मंदार किवळे याला तातडीने ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील काही तासांबाबत सावध भूमिका घेतली आहे.
मंदारची प्रकृती क्रिटिकल; डॉक्टरांकडून 72 तासांचे निरीक्षण
ससून रुग्णालयाचे डीन डॉ. येल्लाप्पा जाधव यांनी मंदारच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्याची स्थिती चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले. हल्ल्यात त्याला अनेक ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे सध्या त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
पुढील 72 तास त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या कालावधीत त्याच्या प्रकृतीत कसा बदल होतो, उपचारांना शरीर कितपत प्रतिसाद देते आणि रक्तस्त्रावामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंती कशा नियंत्रित होतात, यावर डॉक्टरांचे लक्ष असेल. त्यामुळे आताच त्याच्या प्रकृतीबाबत ठोस अंदाज व्यक्त करता येणार नसल्याचे डीन यांनी सांगितले.
गोळी लागण्यासह कोयत्याचे वार; डोक्यालाही फ्रॅक्चर
या हल्ल्यात मंदारला गोळीबार आणि कोयत्याच्या वारांमुळे गंभीर दुखापती झाल्या आहेत. डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी त्याच्या उजव्या हाताला आणि पाठीला चाटून गेली आहे. मात्र, त्यानंतर झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात त्याच्या दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या आहेत.
हल्लेखोरांकडून कोयत्याने वार होत असताना मंदारने स्वतःचा बचाव करण्यासाठी दोन्ही हात डोक्याभोवती धरले होते. त्यामुळे त्याच्या हातांवर अनेक वार झाले. या हल्ल्यात त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस फ्रॅक्चरही झाले आहे. एकीकडे हातांवरील गंभीर जखमा आणि दुसरीकडे डोक्याला झालेली दुखापत यामुळे त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनली आहे.
जामिनावर बाहेर आल्यानंतर न्यायालयाबाहेरच हल्ला
मंदार किवळे याचे नाव 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आले होते. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला होता. मंगळवारी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तो शिवाजीनगर न्यायालयात आला होता. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो दुपारी सव्वा एकच्या सुमारास न्यायालयाच्या गेट नंबर 4 मधून बाहेर पडला.
याच वेळी दुचाकींवरून आलेल्या सहा जणांनी त्याला लक्ष्य केले. हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळी मिसफायर झाल्याने त्यांचा पहिला प्रयत्न फसला. त्यानंतर हल्लेखोरांनी मंदारचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली.
हल्ला केल्यानंतर सहाही जण दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंदारला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार सुरू झाल्याने त्याला वैद्यकीय मदत मिळाली; मात्र दुखापतींचे स्वरूप गंभीर असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याचा संशय
या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्याची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणातून हा हल्ला झाल्याची शक्यता तपासली जात आहे. शुभम चव्हाण याच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने अक्षय चव्हाण याने हा कट रचल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण आणि कटातील प्रत्येकाची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांनी दोन पिस्तुले जप्त केली आहेत. हल्लेखोरांची ओळख पटल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी 8 ते 10 विशेष पथके तयार केली असून, विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
शिवाजीनगर न्यायालय हे पुण्यातील महत्त्वाचे न्यायालय असून, येथे दररोज मोठ्या संख्येने वकील, पक्षकार, आरोपी आणि नागरिकांची ये-जा असते. अशा गर्दीच्या आणि संवेदनशील परिसरात सहा हल्लेखोर दुचाकींवरून येतात, पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न करतात आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करून सहज पसार होतात, ही बाब गंभीर मानली जात आहे.
न्यायालयाच्या परिसरात सुरक्षेची व्यवस्था असतानाही हल्लेखोरांनी अशा प्रकारे हल्ला करण्याचे धाडस कसे केले, त्यांच्याकडे शस्त्रे आली कुठून आणि न्यायालयाबाहेरील सुरक्षा यंत्रणेला याची पूर्वकल्पना का मिळाली नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा…
4 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीवर पुण्यात कोर्टाबाहेरच जीवघेणा हल्ला:गोळीबारानंतर कोयत्याने दोन्ही हात छाटले; सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांचा गृहखात्यावर संताप

अवघ्या 4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपीवर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. 20 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथील संतोषनगरमध्ये झालेल्या शुभम सुभाष चव्हाण याच्या हत्येतील मुख्य आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आला असता 6 ते 7 हल्लेखोरांनी सापळा रचून आधी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या रक्तरंजित थरारानंतर पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरून राजकारण तापले असून खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणी 7 संशयित आरोपींची नावेही समोर आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी












