- Marathi News
- Local
- Maharashtra
- Pune Court Firing Incident; Sunetra Pawar Statement | Strict Action
पुण्यातील कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर सुनेत्रा पवार आक्रमक:‘आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही’
- कॉपी लिंक

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणीच हल्लेखोरांनी शस्त्रांसह येऊन एका तरुणावर जीवघेणा हल
शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. शहरातील गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना
पुणे शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क आणि कठोर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः न्यायालये, सार्वजनिक ठिकाणे आणि गर्दीच्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर भर दिला जाणार आहे. केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी अशा गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरजही या घटनेतून समोर आली आहे.
दोन दुचाकींवरून आलेल्या सहा हल्लेखोरांचा हल्ला
दरम्यान, बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी सव्वाच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 जवळ हा थरार घडला. कात्रज परिसरातील रहिवासी मंदार किवळे हा न्यायालयातील सुनावणी पूर्ण करून बाहेर आला होता. त्याचवेळी दोन दुचाकींवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्याला घेरले. सुरुवातीला हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हातातील कोयत्यांनी त्याच्यावर सपासप वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. भरदिवसा आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने उपस्थितांमध्ये भीती पसरली. हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोर मात्र घटनास्थळावरून पसार झाले.
शुभम चव्हाण हत्या प्रकरणातून हल्ल्याचा बदला?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्याची पार्श्वभूमी असण्याची शक्यता आहे. जखमी मंदार किवळे हा 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात आला असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील जुन्या वादातून आणि बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना
या घटनेतील हल्लेखोरांची ओळख पटल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. फरार आरोपींना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी 8 ते 10 विशेष पथके तयार केली असून, विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकी, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला आहे.
मात्र, या घटनेने पुण्यातील सुरक्षाव्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालय परिसरात मोठ्या संख्येने नागरिक, वकील, पक्षकार आणि पोलीस कर्मचारी उपस्थित असतात. अशा ठिकाणी हल्लेखोर शस्त्रे घेऊन येतात आणि भरदिवसा जीवघेणा हल्ला करून पसार होतात, ही बाब चिंताजनक मानली जात आहे. त्यामुळे केवळ आरोपींना अटक करून चालणार नाही, तर न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
सुनेत्रा पवार यांनी आरोपींना सोडणार नसल्याचा दिलेला इशारा आणि पोलिसांना दिलेल्या कठोर कारवाईच्या सूचना यामुळे आता या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पोलीस प्रशासन कोणत्या उपाययोजना करते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा…
जळगावच्या 6 जणांना गुजरातच्या कालव्यात फेकले: आई-वडिलांसह 3 जणांचा मृत्यू, 13 वर्षीय मुलाने पाइप पकडून वाचवला जीव, दोन मुले बेपत्ता; चौघांविरोधात गुन्हा

सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ मजुरीचे काम करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना कालव्यात फेकून दिल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मूळचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल परिसरातील हे कुटुंब मजुरीच्या कामासाठी सूरतला येत असताना अज्ञात कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांची कार अडवली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या कारमध्ये बसवून कालव्यात फेकून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत आई-वडिलांसह तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर 13 वर्षीय मुलाने पाइपच्या साहाय्याने आपला जीव वाचवला. कुटुंबातील इतर दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. या प्रकरणी महाराष्ट्रात राहणाऱ्या कुटुंबातील विवाहित मुलीच्या तक्रारीवरून बारडोली पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी












