Mon, Nov 23, 2026Updated 11:45 PM IST

मुंबई बँक सर्वसामान्यांच्या विश्वासातून उभी:16 हजार कोटींची उलाढाल, राहुल नार्वेकरांकडून बँकेच्या कार्याचे कौतुक

मुंबई4 तासांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँका केवळ आर्थिक आकडेवारीच्या जोरावर मोठ्या होत नाहीत, तर सर्वसामान्य माणसाने दाखवलेल्या विश्वासातून त्यांची उभारणी होत असते. सामान्य माणसाला आर्थिक मदत आणि व्यवसायासाठी वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी

.

या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, आमदार प्रमोद जठार, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, संचालक नंदकुमार काटकर, प्रकाश दरेकर, अनिल गजरे, विनोद बोरसे, विष्णू घुमरे, जिजाबा पवार, आनंदराव गोळे, पुरुषोत्तम दळवी, विठ्ठलराव भोसले, जयश्री पांचाळ, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, तेजस्वी घोसाळकर, कार्यकारी संचालक संदीप सुर्वे, कर्मचारी प्रतिनिधी बंटी म्हशीलकर, भारत थोरात यांच्यासह सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामान्य माणसाला आर्थिक बळ देणारी मुंबई बँक

यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई बँकेच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, मुंबईमध्ये अनेक मोठ्या राष्ट्रीय आणि खासगी बँका कार्यरत आहेत. मात्र, मुंबई बँक ज्या पद्धतीने मायक्रो फायनान्सिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आर्थिक सुविधा उपलब्ध करून देते, तसे काम फार कमी आर्थिक संस्था करतात. सामान्य माणसाला आर्थिक व्यवहारांसाठी सहजपणे वित्तपुरवठा उपलब्ध करून देणे आणि त्याला स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी संधी देणे, हे मुंबई बँकेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

पद्मभूषण वसंतदादा पाटील यांची ओळख ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून असली, तरी सहकार चळवळीतील हाडामासाचा कार्यकर्ता म्हणूनही त्यांचे योगदान मोठे आहे. सहकाराच्या माध्यमातून तळागाळातील माणसाच्या हातात पैसा पोहोचवणे आणि त्याला व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे, ही त्यांची संकल्पना होती. हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबई बँकेने मोठे प्रयत्न केले आहेत. बँकांची खरी ताकद त्यांच्या आर्थिक आकड्यांमध्ये नसून सर्वसामान्य ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासामध्ये असते. मुंबई बँकेने हा विश्वास संपादन केला आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले.

1,200 कोटींवरून 16 हजार कोटींची उलाढाल

विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना बँकिंग क्षेत्राला अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणारे आणि सामान्य नागरिकांच्या हिताचे कायदे तयार करण्याकडे आपले लक्ष असते, असेही नार्वेकर यांनी सांगितले. आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानसभेत सातत्याने बँकिंग क्षेत्राशी संबंधित विषय मांडून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई बँकेने मोठी आर्थिक प्रगती केली आहे.

पूर्वी सुमारे 1,200 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या मुंबई बँकेची उलाढाल आता 16 हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे. भविष्यातही मुंबई बँक आपले काम असेच सुरू ठेवेल आणि सर्वसामान्यांना बँकिंग व आर्थिक सुविधांचा अधिकाधिक लाभ मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्यातही मुंबई बँक महत्त्वपूर्ण सहकार्य करत आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून मुंबई बँकेची ओळख निर्माण झाली असल्याचेही नार्वेकर म्हणाले.

वसंतदादांचे नाव देणे म्हणजे वैचारिक वारशाचा सन्मान

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या नावाने सभागृहाचे नामकरण करणे हा केवळ नामकरण सोहळा नसून सहकार क्षेत्रातील त्यांच्या वैभवशाली विचारांना दिलेली मानवंदना असल्याचे सांगितले. मुंबईमध्ये एका बाजूला मोठे कॉर्पोरेट क्षेत्र आहे, तर दुसऱ्या बाजूला सहकार चळवळीच्या माध्यमातून उभे राहिलेले मोठे आर्थिक सामर्थ्य आहे. हा विरोधाभास नसून मुंबईकरांच्या एकजुटीचे आणि सहकाराच्या ताकदीचे प्रतीक आहे.

मुंबई ही कधीही न थांबणारी नगरी आहे. या शहराच्या विकासाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने ऊर्जा देण्याचे काम कामगार, मध्यमवर्गीय नागरिक आणि सहकारी संस्थांनी केले आहे. या सर्वांचा आर्थिक कणा म्हणून मुंबई बँक गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहे. स्पर्धेच्या युगात अनेक मोठ्या आर्थिक संस्था अडचणीत येत असताना मुंबई बँकेने हिरक महोत्सवी टप्पा ओलांडून यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

बँकेने जुन्या पिढीचा विश्वास जपतानाच तरुण पिढीच्या गरजाही ओळखल्या आहेत. बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी किंवा आकडे मोजणारी तिजोरी नसावी, तर तिच्यामध्ये माणुसकीचा ओलावा आणि सामाजिक जाणिवाही असली पाहिजे. मुंबई बँकेने आपल्या कामातून हे सिद्ध केले आहे, असे तावडे यांनी नमूद केले.

स्वयं पुनर्विकास योजनेचे महापौरांकडून कौतुक

मुंबई बँकेच्या स्वयं पुनर्विकास योजनेचेही महापौर रितू तावडे यांनी कौतुक केले. मुंबईकरांचे जीवनमान उंचावणे, महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच सुरक्षित, सुंदर आणि स्वच्छ मुंबई घडविण्यासाठी मुंबई महापालिका सहकार चळवळीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी महापालिका आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी सभागृहाचा उपयोग करणार

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील विविध उपक्रम, शैक्षणिक कार्यक्रम आणि प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुंबईतील सहकार चळवळीतील नेते, कार्यकर्ते आणि सहकारी संस्थांना या सभागृहाच्या माध्यमातून एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

मुंबई बँकेची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा बँकेची उलाढाल सुमारे 1,200 कोटी रुपये होती. मात्र, संचालक मंडळाच्या सहकार्याने आणि सर्वांच्या प्रयत्नांतून आज बँकेने 16 हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढालीचा टप्पा गाठला आहे. या प्रवासात अनेक संकटे आली; मात्र मुंबईतील सहकारी संस्था आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर बँकेने आपली वाटचाल सुरू ठेवली. बँकेने केवळ बँकिंग व्यवहार केले नाहीत, तर सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यासोबतच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. समाजातील मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य घटकांना मदत करण्याची भूमिका बँकेने घेतली आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

महिलांना उद्योगासाठी 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. लाडक्या बहिणींना स्वतःचा उद्योग सुरू करता यावा, यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांना केवळ आर्थिक मदत न करता त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.

याचबरोबर आता 'नमो टॅक्सी' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यात जवळपास 100 टॅक्सी मुंबईत आणण्यात येणार आहेत. या योजनेत महिलांचा सन्मान आणि सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने एकूण गाड्यांपैकी 50 टक्के गाड्या महिलांना बिनव्याजी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबईच्या रस्त्यांवर महिला टॅक्सी चालक म्हणून काम करताना दिसतील. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून आर्थिक मदत आणि पाठबळ देणारी संस्था म्हणून मुंबई बँक काम करत असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

महिला सहकारी संस्था आणि मजूर संस्थांना महापालिकेने पाठबळ द्यावे

यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून महिला सहकारी संस्था, बेरोजगार सहकारी संस्था आणि मजूर सहकारी संस्थांना अधिकाधिक संधी व आर्थिक पाठबळ देण्याची मागणी केली. मुंबई महापालिकेत अनेक कष्टकरी नागरिक सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करतात. मात्र, त्यांच्या थकीत बिलांचा प्रश्न प्रलंबित आहे. महिला सहकारी संस्थांची संख्या मोठी असून त्यांच्या थकीत बिलांचा प्रश्न महापौरांनी विशेष बैठक घेऊन मार्गी लावावा, अशी विनंती त्यांनी केली.

मुंबईसारख्या मोठ्या शहरातील कामकाज केवळ 5 ते 10 कंत्राटदारांच्या माध्यमातूनच चालणार असेल, तर महिला सहकारी संस्था, बेरोजगार सहकारी संस्था आणि मजूर सहकारी संस्थांनी काय करायचे, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला. या संस्थांना कामाच्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून कष्टकरी नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

अडचणीतील अर्बन बँकांना 200 कोटींचे सहाय्य देण्याची मागणी

राज्यातील अनेक अर्बन सहकारी बँका सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. या बँकांना सरकारकडून आर्थिक आणि धोरणात्मक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात राज्य सरकारने एक समिती नेमली असून या समितीने अर्बन बँकांना सहाय्य करण्यासाठी 200 कोटी रुपयांच्या निधीची शिफारस केली आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी विनंती आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.

सहकार क्षेत्रातील संस्था टिकल्या आणि सक्षम झाल्या, तर त्यातून सर्वसामान्य नागरिक, महिला, कामगार आणि लघुउद्योजकांना आर्थिक बळ मिळेल. त्यामुळे सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.

एकूणच, पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुंबई बँकेच्या आर्थिक वाटचालीसोबतच सहकार क्षेत्राचा विस्तार, महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार, सहकारी संस्थांचे प्रश्न आणि अर्बन बँकांना आर्थिक सहाय्य अशा विविध मुद्द्यांवर या कार्यक्रमात चर्चा झाली. मुंबईच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सहकार चळवळीची भूमिका अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

हेही वाचा….

शंभूराज देसाईंनी महायुतीचा धर्म पाळला नाही:जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्या अर्जुन काळेंना पाडण्यासाठी प्रयत्न केले – जयकुमार गोरे यांचा गंभीर आरोप

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीनंतर ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे आणि पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गोंदवले येथे बोलताना जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या एका संचालकाला पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करत, हे शंभूराज देसाई यांना शोभते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच जिल्हा बँकेतील यापूर्वीचे कथित गैरव्यवहार बाहेर काढण्याचा इशारा देत 100 कोटींचे सॉफ्टवेअर आणि 100 कोटींचे लॅपटॉप कुठे गेले, याचा शोध घेणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…..


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links